‘या’ देशातल्या फॅन्सकडून अजिबात पाठिंबा मिळत नाही – रोहित शर्मा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ROHIT-SHARMA-Frame-copy-2.jpg)
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. याशिवाय सध्या दोन विविध देशातील क्रिकेटपटू देखील लाईव्ह चॅट च्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. नुकताच भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने बांगलादेशचा सलामीवीर तमिम इकबाल याच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्याने एका विशिष्ट देशातील फॅन्सकडून भारतीय खेळाडूंना पाठिंबा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.
“भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात क्रिकेट खूपच जास्त लोकप्रिय आहे. दोन्ही देशांत क्रिकेट चाहत्यांची संख्या भरपूर आहे. जर एखाद्या सामन्यात खेळाडूने चूक केली तर फॅन्स त्याच्यावर प्रचंड टीका करतात. बांगलादेशातदेखील हीच स्थिती आहे. एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. भारतीय संघाला चाहत्यांच्या पाठिंब्याशिवाय खेळायची सवय नाही, पण बांगलादेश हा असा एक देश आहे जिथे भारतीय खेळाडूंना अजिबात पाठिंबा मिळत नाही”, असं रोहितने स्पष्टपणे सांगितलं.
आम्ही अनेक देशातील अनेक मैदानांवर क्रिकेट खेळतो. सगळीकडे आम्हाला तेथील स्थानिक चाहत्यांचा पाठिंबा मिळत असतो. पण बांगलादेश मध्ये मात्र आम्हाला ते चित्र दिसत नाही. बांगलादेशचे चाहते केवळ तुमच्याच संघातील खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात. सध्याचा बांगलादेशचा संघ खूपच चांगला आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याची प्रचिती आली. कदाचित म्हणूनच चाहते फक्त तुम्हाला पाठिंबा देत असावेत”, असे रोहित म्हणाला.