…म्हणून शिवमला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं – विराट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/SHIVAM-CRICKETER.png)
महाईन्यूज |
विंडीजने धडाकेबाज लेंडल सिमन्स याच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली होती. या विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.
सामन्यात भारताकडून एक चांगली गोष्ट घडली. नवोदित शिवम दुबे याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि त्याने अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे कर्णधार विराटने स्वत:च्या जागी त्याला फलंदाजीस पाठवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र सामना संपल्यानंतर विराटने याबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक आहे हे आम्हाला माहित होते. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक शिवमला बढती दिली. फिरकीपटूंवर आक्रमण करणं हे त्याचं काम होतं. ते त्याने चोख पार पाडले आहे. आमची जी योजना होती, ती उत्तमप्रकारे अंमलात आणली गेली’, असे विराटने सांगितले आहे.