‘मुस्लीम असल्याने शमीची कामगिरी अव्वल’, पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Shami.jpg)
भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शामी सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये अंतीम ११ खेळाडूंमध्ये शामीला संधी देण्यात आली नव्हती. मात्र मागील चार सामन्यांमध्ये त्याने १४ बळी घेत या विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने तमीम इक्बालला माघारी पाठवले. मात्र आता शमीच्या कामगिरीवर एका माजी पाकिस्तानी खेळाडूने वादग्रस्त विधान केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताचा या स्पर्धेतील पहिला पराभव होता. मात्र त्यानंतर भारताने मंगळवारी बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत उपांत्य फेरीमध्ये जागा पक्की केली. असे असली तरी भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये अजूनही भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचीच चर्चा सुरु आहे. याच पराभवाचे विश्लेषण करताना पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त यांनी शमीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीवर भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना बख्त यांनी शमीच्या चांगल्या कामगिरीचा संबंध त्यांच्या मुस्लीम असण्याशी जोडला आहे.
काय म्हणाले बख्त
इंग्लंडने भारताचा पराभव केल्याने पाकिस्तानची उपांत्य फेरीतील वाट बिकट झाली. याच पराभावचे विश्लेषण बख्त एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत करत होते. ‘भारताकडे सर्वोत्तम गोलंदाज आहेत. बुमराह तर जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने विकेट घेतली नाही तर कुलदीप यादव विकेट घेतो. चहलही भारतासाठी हुकूमी एक्का आहे. आता तर शमीनेही आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून खेळणारा शमी मुस्लीम आहे ही चांगली गोष्ट आहे. मी भारताची गोलंदाजी पाहिली आहे. भारताचे मुख्य गोलंदाज इंग्लंविरुद्ध चालले नाहीत. यावद आणि चहलची इंग्लडच्या फलंदाजांनी धुलाई केली. त्यामुळेच इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत मजल मारता आली,’ असं मत बख्त यांनी व्यक्त केलं आहे.
बख्त यांच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
पाकिस्तानी संघात तर सगळेच मुस्लीम आहेत मग…
आमच्या संघातील सर्वजण भारतीय आहेत
तो मुस्लीम असण्याचा काय संबंध
आमच्याकडे असं नसतं
हसू थांबवावं लागलं
पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्रिया
बख्त यांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केलेले नाही
बख्त यांनी अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची पाहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशी विचित्र वक्तव्य केली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधीही त्यांनी भारत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी इंग्लंडविरुद्ध मुद्दाम सामना हरेल. भारताला पाकिस्तानकडून पराभव होण्याची भिती असल्याने ते पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी मुद्दाम हरतील असे मत बख्त यांनी व्यक्त केले होते. भारत इंग्लंड सामन्याच्या निकालानंतर त्यांनी मी खरं बोलत होतो असा दावाही केला. ‘भारताने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरुन त्यांना या सामन्याबद्दल गांभीर्य वाटत नव्हते’ असा आरोपही बख्त यांनी केला होता.