भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये वाडेकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा प्रराक्रम केला.
अजित वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईमध्ये झाला होता. वाडेकर यांनी प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळण्याची सुरुवात १९५८ मध्ये केली होती. तर आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात १९६६ मध्ये केली. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द १९६६ ते १९७४ अशी आठ वर्ष होती.
३ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिज विरुध्दच्या कसोटीतून अजित वाडेकर यांनी पदार्पण केले. १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता.
अजित वाडेकर एकदिवसीय सामन्यांचे पहिले कर्णधार होते. वाडेकर यांनी भारताकडून कसोटी ३७ सामने खेळले असून यामध्ये २११३ धावा केल्या आहेत. तर यात १ शतक व १४ अर्धशतकांचा समावेश आहे. वाडेकर यांनी दोन एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये ७३ धावा केल्या आहेत. अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्काराने तर १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.