भारतीय ज्युनियर हॉकी संघाने हॉलंडला बरोबरीत रोखले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/PTI7_21_2018.jpg)
अँटवर्प (बेल्जियम): मनदीप मोरच्या झुंजार कामगिरीमुळे बलाढ्य हॉलंड संघाला 0-2 अशा पिछाडीवरून 2-2 अशा बरोबरीत रोखताना भारतीय संघाने 23 वर्षांखालील ज्युनियर हॉकी स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. या स्पर्धेत पाच देशांचा समावेश आहे.
हॉलंड संघाच्या मार्लोनने पहिल्या सत्राच्या
पहिल्याच मिनिटाला भारताच्या कमकुवत बचावफळीला भेदत सामन्यातील पहिला गोल केला. त्यामुळे भारतीय संघ दबावाखाली गेला. त्याचाच फायदा घेत जिप जान्सेनने सामन्याच्या 11व्या मिनिटालाच संघाचा दुसरा गोल करून हॉलंड संघाला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारतावरील दडपण आणखीन वाढले. त्यानंतर भारताने पहिल्या सत्रात गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र हे सर्व प्रयत्न यशस्वीरित्या परतवून लावताना हॉलंडने भारताला पहिल्या सत्रात गोलविरहित ठेवून 2-0 अशी आघाडी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात मात्र भारताने पहिल्यापासूनच हॉलंडच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ला चढवला, याचा फायदा भारताला 27व्या मिनिटाला झाला. भारताच्या मनदीप मोरने भारताकडून पहिल्या गोलची नोंद करताना आपल्या संघाची पिछाडी 1-2 अशी काही प्रमाणात कमी केली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे अखेरच्या सत्रात हॉलंड विजयी होईल अशी सर्वांचीच अपेक्षा असताना मनदीपने 48व्या मिनिटाला आणखीन एक गोल करताना भारताला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. त्याच्या या गोलमुळे हॉलंडला बरोबरीत रोखणे भारतीय युवक संघाला शक्य झाले.