भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kapil-dev-aatack.jpg)
नवी दिल्ली – भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे समजते आहे. दरम्यान, कपिल देव यांच्या स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या असून 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच वनडे कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या असून 253 विकेट्स घेतले आहेत. देव यांनी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता. त्यांच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकला होता. आज ते करोडो क्रिकेटप्रेमींचे आदर्श आहेत.