फिफा विश्वचषक : रोनाल्डोनची हॅटट्रिक, स्पेन-पोर्तुगाला सामना बरोबरीत
सोची – फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये थरारक लढत झाली. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने या विश्वचषकात पहिली हॅटट्रिक केली. रोनाल्डोच्या या हॅटट्रिकच्या जोरावरच पोर्तुगालने फिफा विश्वचषकाच्या ग्रुप बीमधील सामन्यात स्पेनला 3-3 असे बरोबरीत रोखले.
पोर्तुगालने रफिश्ट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात शानदार सुरुवात केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला स्पेनचा डिफेंडर नॅचोने रोनाल्डोला बॉक्समध्ये पाडले. यामुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने ही संधी न सोडता गोल करुन आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालला 22 व्या मिनिटात आपली आघाडी वाढवण्याची संधी मिळाली, पण कर्णधार रोनाल्डोकडून मिळालेल्या पासवर गोल करण्यास फॉरवर्ड गोनकालो गुएडेसला यश आल नाही. यानंतर दोन मिनिटांनी स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टाने पोर्तुगालचा डिफेन्स भेदून गोल केला आणि सामन्यात बरोबरी केली.
स्पेनचा खेळ बरोबरी केल्यानंतर आणखीच चांगला झाला. पहिला हाफ 1-1 वर बरोबरीत संपला. पण रोनाल्डोने 44व्या मिनिटाला गोल केल्याने पोर्तुगालला सामन्यात 2-1 ने आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये स्पेनचा संघ खूपच आक्रमकतेने खेळला. 55व्या मिनिटाला स्पेनला फ्री किक मिळाली. त्याचा पुरेपुर फायदा घेत डिएगो कोस्टाने गोल करुन पुन्हा एकदा संघाला बरोबरीत आणले.
यानंतर तीनच मिनिटांनी डिफेंडर नॅचो फर्नांडिसने आपल्या संघासाठी गोल डागत स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनने ती आघाडी तीस मिनिटे टिकवली. मात्र अखेर सामना संपायला दोन मिनिटं असताना रोनाल्डोने फ्री किकवर मारलेल्या जादुई गोलने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली.