breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : इंग्लंडची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

पेनल्टी शूट आऊटमध्ये कोलंबियावर थरारक मात

मॉस्को: मध्यंतरापर्यंत आणि निर्धारित वेळेअखेरही बरोबरीत सुटलेल्या आणि निर्णायकच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत कोलंबियाचा 4-3 असा चित्तथरारक पराभव करताना इंग्लंडने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. इंग्लंडने 2006 नंतर पहिल्यांदाच हा मान मिळविला आहे.

या विजयामुळे इंग्लंडने प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सलग पाच वेळा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभवांची मालिका खंडित करताना नवा इतिहास लिहिला. आता येत्या शनिवारी होणाऱ्या उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत इंग्लंडसमोर स्वीडनचे कडवे आव्हान आहे. मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीनंतर कार्लोस सॅंचेझने केलेल्या फाऊलमुळे मिळालेल्या पेनल्टीवर हॅरी केनने 57व्या मिनिटाला इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

निर्धारित वेळेनंतरसुद्धा ही आघाडी कायम होती व इंग्लंड संघ सहज उपान्त्यपूर्व फेरीत जाणार असे दिसत असतानाच “इंजुरी टाईम’मधील तिसऱ्या मिनिटाला लक्ष्यवेध करताना येरी मिना याने कोलंबियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. येरी मिनाने सलग तिसऱ्या सामन्यांत मोक्‍याच्या क्षणी गोल करून कोलंबियाला वाचविले. त्यानंतर जादा वेळेतही बरोबरीची कोंडी फुटली नाही. त्यामुळे पंचांनी पेनल्टी शूट आऊटचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला.
पेनल्टी शूट आउटचा थरार अपेक्षेप्रमाणेच रंगला.

जेम्स रॉड्रिगेझचा अनुपस्थितीचा कोलंबियाला फटका

अत्यंत महत्त्वाच्या अशा या सामन्यासाठी अव्वल मध्यरक्षक जेम्स रॉड्रिगेझ दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याचे सामन्यापूर्वीच स्पष्ट झाल्याने कोलंबियाला जबरदस्त धक्‍का बसला. चार वर्षांपूर्वी ब्राझिलमध्ये झालेल्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत सहा गोल नोंदवीत “गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावणारा रॉड्रिगेझ पोटरीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरला नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यामुळे कोलंबियाला हमखास गोल करणाऱ्या खेळाडूची उणीव निश्‍चितच जाणवली. दरम्यान इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी कोलंबियाविरुद्धच्या सामन्यासाठी हॅरी केन, रहीम स्टर्लिंग आणि डेले अली यांना पुन्हा पाचारण केले आणि त्याचा फायदाही इंग्लंडला मिळाला. हॅरी केनने इंग्लंडकडून पेनल्टी शूट आऊटमधील पहिला गोल नोंदविताना या स्पर्धेतील सहाव्या गोलची नोंद केली. त्यामुळे सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

असा रंगला “पेनल्टी शूट आऊट’चा थरार

इंग्लंडने गेल्या सलग पाच पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव पत्करला आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत सहभागी झालेल्या आठपैकी केवळ दोन पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळविले आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंवर कमालीचे दडपण होते. पेनल्टी शूट आऊटमध्ये रॅडामेल फाल्काव व हॅरी केन यांनी अनुक्रमे कोलंबिया व इंग्लंडकडून पहिल्या संधीला गोल करीत बरोबरी साधली.

त्यानंतर युआन क्‍वाड्राडो आणि मार्कस रॅशफोर्ड यांनीही अचूक लक्ष्यवेध करीत गुणफलक 2-2 असा बरोबरीत राखला. दोन्ही संघांमधील खेळाडूंवर दडपण वाढत असताना कोलंबियाच्या लुईस म्युरियलने तिसऱ्या पेनल्टीला गोल केल्यावर कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिनाने इंग्लंडच्या जॉर्डन हेंडरसनचा फटका रोखून आपल्या संघाला 3-2 असे आघाडीवर नेले. परंतु चौथ्या पेनल्टीला कोलंबियाच्या मॅटेयस उरिबेच्या फटक्‍यावर चेंडू क्रॉसबारवर आदळून बाहेर गेला आणि कायरॉन ट्रिपियरने चौथ्या पेनल्टीवर गोल करीत इंग्लंडला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. निर्णायक पाचव्या पेनल्टीला कोलंबियाच्या कार्लोस बॅकाचा फटका इंग्लंडचा गोलरत्रक जॉर्डन पिचफोर्डने रोखला आणि एरिक डायरने कोणतीही चूक न करता अचूक लक्ष्यवेध करीत इंग्लंडच्या 4-3 अशा विजयाची निश्‍चिती केली.


Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button