फिफा विश्वचषक : जर्मन माध्यमांची पराभवानंतर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/germany-vs-mexico-1.jpg)
बर्लिन – गतविजेत्या जर्मनीला फिफा विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात मेक्सिकोकडून खळबळजनक पराभव पत्करावा लागला. 1982 नंतर पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ ठरली. या पराभवाचा धक्का जर्मन खेळाडूंइतकाच त्यांच्या पाठीराख्यांनाही बसला.
जर्मनीची बचावफळी पेंगत असल्याचे पाहून मेक्सिकोच्या हायर्विंग लोझॅनोने 35व्या मिनिटाला लक्ष्यवेध करीत जर्मनीला हादरा दिला होता. त्यानंतर जर्मनीतील बहुतांश प्रसार माध्यमांनी आपल्या संघावर कडाडून टीका केली आहे. जर्मनीतील सर्वाधिक खपाच्या “बिल्ड’ या नियतकालिकाने तर “अत्यंत नामुष्कीजनक पराभव. या पराभवामुळे समस्त जर्मन पाठीराख्यांची चिंता द्विगुणित केली आहे’, असे आपले संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
तसेच म्युनिचमधील आणखी एक नियतकालिक स्यूड्युश जेईतुंग यांनीही हा पराभव सर्वांच्याच चिंतेत भर घालणारा असल्याचे म्हटले आहे. “जर्मनीसाठी चुकीचा प्रारंभ’ असा मथळा देताना फ्रॅंकफुर्टमधील “अल्जेमाईन’ने जर्मन खेळाडूंना लक्ष्य केले आहे. “स्पोर्टस बिल्ड’ने तर या सामन्यात गतविजेते खेळत असल्याचे कधीच दिसले नाही, अशी टीका केली आहे. जर्मनीतील बहुतांश क्रीडा समीक्षकांनीही जर्मन खेळाडूंच्या पहिल्या सामन्यातील अत्यंत निराशाजनक आणि किमान निकषालाही न पोहोचणाऱ्या कामगिरीला टीकेचे लक्ष्य केले आहे.