पुणेरी पलटण विजयी मार्गावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/puneri-paltan-1.jpg)
प्रो कबड्डीच्या सहाव्या सत्राची सुरुवात खूप थाटामाटात झाली होती. पहिल्या दिवशी पुणेरी पलटण आणि यु मुंबा यांचा सामना बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण विरुद्ध हरयाणा स्टीलर्स सामना झाला. हा सामना पुणेरी पलटण ३४-२२ असा आरामात जिंकला. पुणेरी पलटणसाठी नितीन तोमर याने सर्वाधिक ७ रेडींग गुण मिळवले तर संदीप नरवाल आणि गिरीश यांनी डिफेन्समध्ये सातत्य ठेवले. हरयाणासाठी स्टीलर्ससाठी विकास कंडोला आणि सुरिंदर नाडा यांनी चांगली कामगिरी परंतु ते संघाला विजयाच्या जवळ देखील नेऊ शकले नाहीत.
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी संयमी खेळ केला. पहिल्या सत्रात ७ मिनिटे झाली तेव्हा दोन्ही संघ ४-४ अश्या समान गुणसंख्येवर होते. त्यांतर पुणेरी पलटणने आपला खेळ उंचावत विरोधी संघाला ऑल आऊट केले आणि १३-८ अशी आघाडी मिळवली. पहिले सत्र संपले तेव्हा पुणेरी पलटण संघ १५-९ असा आघाडीवर होता.
दुसऱ्या सत्रातील पहिल्या काही मिनिटात हरयाणा स्टीलर्स यांनी सामन्यात परतण्याचे संकेत दिले. परंतु, त्यांना ऑल आऊट केल्यावर सामना पूर्णपणे पुणेरी पलटणच्या बाजूने झुकला. त्यांनी प्रथम २०- १४ अशी आघाडी घेतली. त्यांतर सामन्याला ६ मिनिटे शिल्लक होते तेव्हा पुणेरी संघ ३०- १७ असा पुढे होता. तेव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. त्यानंतर पुणेरी संघाने हा सामना ३४-२२ असा जिंकला.
काल झालेला महाराष्ट्रीयन डर्बी सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पुणेरी संघाने या मोसमातील पहिला विजय मिळवला. त्यांचा पुढील सामना १२ ऑक्टोबररोजी दबंग दिल्ली विरुद्ध होणार आहे.