पहिल्या परीक्षेत ‘हिटमॅन’ पास, झळकावलं अर्धशतक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Rohit.jpg)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली. पहिल्या सत्राअखेरीस भारताने बिनबाद ९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात जागा मिळालेल्या रोहित शर्माने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. पहिल्या सत्राअखेरीस आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं. रोहितने ८४ चेंडूत ५२ धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
लोकेश राहुल कसोटी मालिकेत अपयशी ठरत असताना निवड समितीने रोहित शर्मावर विश्वास टाकत त्याला कसोटी सामन्यात सलामीला येण्याची संधी दिली. मात्र आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात रोहित अवघे २ चेंडू खेळत शून्यावर माघारी परतला होता. त्यामुळे भारताने केलेला हा प्रयोग फसतोय की काय असं अनेकांना वाटलं होतं. मात्र पहिल्या दिवसाच्या खेळात रोहितने आश्वासक सुरुवात करत भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली .
दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालनेही रोहितला चांगली साथ दिली. मयांकने पहिल्या सत्रापर्यंत ९६ चेंडू खेळत ६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ३९ धावा केल्या आहेत.