breaking-newsक्रिडा

पंजाब-मुंबई प्ले-ऑफसाठीच लढणार

  • दोन्ही संघांना पुनरागमनाची अखेरची संधी 

मुंबई – लागोपाठ चार सामन्यात पराभव पत्करल्यामुळे पाचव्या स्थानी घसरण झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला बाद फेरी गाठण्यासाठी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आपल्या आगामी दोन्ही सामन्यांत विजय मिळवणे आवश्‍यक असून त्यांचा सामना स्पर्धेतील आव्हान जवळपास संपलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध उद्या (बुधवार) रंगणार आहे. प्ले-ऑफ फेरीसाठी आपले आव्हान कायम राखण्याकरिता या सामन्यात विजय मिळविणे दोन्ही संघांना आवश्‍यक आहे.

आयपीएलच्या अकराव्या मोसमात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत पहिल्या तीन संघांमध्ये स्थान राखलेल्या पंजाबला गेल्या पाच सामन्यांमधील चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. लागोपाठ झालेल्या या पराभवांमुळे त्यांचे बाद फेरीतील स्थान धोक्‍यात आले आहे. त्याच वेळी मोसमाच्या सुरुवातीपासून पिछाडीवर राहिलेल्या मुंबई संघाने गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून बाद फेरीतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते.

मात्र राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्या नंतर त्यांचे मालिकेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबईने आपल्या आगामी दोन्ही सामन्यांत मोठे विजय मिळवल्यास निव्वळ धावगतीच्या आधारे त्यांना बाद फेरी गाठता येऊ शकेल. यामुळे मुंबईचा संघ उद्याच्या सामन्यात आपले सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. परिणामी मुंबई विरुद्ध पंजाब हा सामना अत्यंत चुरशीचा होईल अशीच समस्त क्रिकेटशौकिनांची अपेक्षा आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडून यंदाच्या संपूर्ण मोसमात ईशान किशन, सूर्यकुमार यादव व एविन लुईसने चांगली कामगिरी केली आहे. त्याच वेळी कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या एखाद-दुसऱ्याच सामन्यात चांगले खेळले आहेत. त्यामुळे मुंबईला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

तसेच पंजाब संघ संपूर्ण मोसमात केवळ लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्या फलंदाजीवर अवलंबून राहिला आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये लोकेश राहुल वगळता इतर एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यातच युवराज सिंगसारख्या फलंदाजाला बाहेर बसवून मयंक अगरवाल, करुण नायर आणि अक्षर पटेल यांना अनेक वेळा संधी दिली गेली आहे. मात्र त्यांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. डेव्हिड मिलर, मनोज तिवारी यांच्यासारखे अव्वल दर्जाचे फलंदाज पंजाबने बेंचवर बसवून ठेवले आहेत. उद्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंजाबला विजय मिळवायचा असल्यास सातत्याने अपयशी ठरलेल्या खेळाडूंना वगळून अन्य दर्जेदार खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. तसेच पंजाब संघात मधली फळी आहे की नाही, असा खोचक प्रश्‍न विचारणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर देण्याची संधी उद्याच्या सामन्यात पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मिळणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button