धोनीचा मास्टर प्लॅन, अन् पंजाब चितपट
मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबला धूळ चारली. सामन्यात एक वेळ चेन्नईचे फलंदाज एकामागोमाग बाद होत होते आणि जिंकण्याची शक्यता धूसर होत होती. नेमक्या त्याच वेळी धोनीने एक डाव खेळला, ज्यामुळं सामन्याचे चित्रच बदलून गेले. चेन्नईचे फलंदाज लागोपाठ तंबूत परतत असल्याचे पाहून धोनीने अचानक हरभजन सिंग आणि दीपक चाहर यांना फलंदाजीसाठी पाठवले.
आघाडीचे मोहरे पडत असताना धोनीनं गोलंदाजांना फलंदाजीसाठी पाठवल्यानं सगळेच आश्चर्य व्यक्त करत होते. परंतु धोनीचे हे डावपेच कमालीचे यशस्वी ठरले. याबाबत सामन्यानंतर धोनीने सांगितले की, महत्त्वाचे फलंदाज खेळपट्टीवर असताना गोलंदाज प्रभावी मारा करतात. पण तळाचे खेळाडू फलंदाजीसाठी आले की गोलंदाजांची शैली बदलते. मग हे गोलंदाज बाउन्सर, ऑफ कटरसारखे प्रयोग करतात.
अशावेळी हे तळाचे फलंदाज आडवे-तिडवे फटके मारून वेगाने धावा काढतात, धावगती वाढवतात आणि गोलंदाजांची लय बिघडवितात. कालच्या सामन्यातही तसेच झाले. हरभजनने 22 चेंडूंत 19 धावा केल्या, तर चाहर 20 चेंडूंवर 39 धावा करून बाद झाला. पण या दोघांमुळे विजयासाठी अपेक्षित धावांचे अंतर कमी झाले आणि नंतर येणाऱ्या फलंदाजांना सहज लक्ष्य गाठता आले.