breaking-newsक्रिडा

दक्षिण आफ्रिका अ संघाच्या 8 बाद 246 धावा

भारत अ संघाचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

बंगळुरू: मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि रजनीश गुरबानी यांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या डावांत 8 बाद 246 धावांवर रोखताना भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजविले. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मालिसू सिबोतो नाबाद 13 धावांवर खेळत होता तर ब्युरेन हेंड्रिक्‍स नाबाद 6 धावांवर त्याला साथ देत होता.

त्याआधी चार दिवसीय दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका अ संघाची सुरुवात खराब झाली. पाटर मेलन केवळ 7 धावा करून परतला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला झुबेर हम्झा एकही धाव न करता परतल्यामुळे त्यांची 2 बाद 20 अशी अवस्था झाली होती.

सॅरेल एर्वी आणि कर्णधार खाया झोंडो यांनी खेळपट्टीवर टिकून खेळताना संघाचा डाव सावरताना 18.3 षटकांत 50 धावांची भागीदारी केली. संघाच्या 70 धावा झाल्या असताना खाया झोंडोला बाद करत नवदीप सैनीने संघाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. सॅरेल एर्वी हाही लगेचच परतला. झोंडोने 51 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 24 धावांची, तर सॅरेलने 120 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.

दक्षिण आफ्रिका अ संघाची 4 बाद 93 अशी घसरगुंडी झाली होती. मात्र सेनुरन मुथ्थूस्वामी आणि रुदी सेकंड यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. या दोघांनी 18 षटकांमध्ये 59 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिका अ संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. मुथ्थूस्वामीने 76 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा करत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सेकंड आणि शॉन वॉन बर्गने 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

संघाच्या 191 धावा झाल्या असताना बर्गला बाद करत चाहलने सामन्यातील आपला पहिला बळी मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत असताना रुदी सेकंडने मात्र एका बाजूने किल्ला लढवीत शतकाकडे वाटचाल सुरू ठेवली होती. मात्र सेकंड 94 धावांवर असताना महंम्मद सिराजने त्याला बाद करत भारत अ संघाला मोठेच यश मिळवून दिले. भारत अ संघाकडून महंमद सिराजने 56 धावांत 3 गडी बाद केले, तर नवदीप सैनी आणि रजनीश गुरबानी यांनी प्रत्येकी 47 धावा देत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका अ – पहिला डाव – 88 षटकांत 8 बाद 246 (रुदी सेकंड 94, सॅरेल एर्वी 47, खाया झोंडो 24, मोहम्मद सिराज 56-3, नवदीप सैनी 47-2, रजनीश गुर्बानी 47-2).

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button