breaking-newsक्रिडा

टेबल टेनिस स्पर्धा : नभा किरकोळे व रामानुज जाधव यांना मिडजेट गटांत विजेतेपद

  • प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: अग्रमानांकित नभा किरकोळे आणि चतुर्थ मानांकित रामानुज जाधव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील 10 वर्षांखालील (मिडजेट) मुली व मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. तसेच वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसऱ्या मानांकित जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.

दहा वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अग्रमानांकित नभा किरकोळेने दुसरे मानांकन असलेल्या रुचिता डावकरचा 11-4, 11-5, 11-8 असा सहज पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नभाने रुचितावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे दडपणाखाली असलेल्या रुचिताला अपेक्षित खेळ करता आला नाही. त्याचा फायदा घेत नभाने लागोपाठ तिन्ही सेट एकतर्फी जिंकून अंतिम सामन्यासह विजेतेपद आपल्या नावे केले. तत्पूर्वी उपान्त्य सामन्यात नभाने चौथे मानांकन असलेल्या नैशा रेवस्करचा 11-4, 11-2, 11-3 असा सहज पराभव करताना अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला होता. तर रुचिताने बिगरमानांकित आकांक्षा मार्कंडेचा 9-11, 12-10, 11-5, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

तसेच दहा वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात चौथे मानांकन असलेल्या रामानुज जाधवने नववे मानांकन असलेल्या शौरेन सोमणचा 11-9, 15-13, 10-12, 8-11, 14-12 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी सामन्यात पहिल्या सेटपासूनच दोघांनी आक्रमक धोरण अवलंबले होते.

त्यामुळे रामानुजला पहिला सेट 11-9 असा संघर्षानंतरच जिंकता आला. दुसऱ्या सेट मध्येही शौरेनने रामानुजला सहज जिंकू दिले नाही. त्यामुळे रामानुजला दुसरा सेट 15-13 असा काठावर जिंकता आला. पहिल्या दोन सेटमध्ये जोरदार खेळ करणाऱ्या शौरेनने तिसरा सेट 10 विरुद्ध 12 गुणांनी, तसेच चौथा सेटही 8 विरुद्ध 11 असा जिंकत रामानुजवर दबाव वाढवला. मात्र रामानुजने पाचव्या सेटमध्ये पुनरागमन करून पाचवा सेट 14-12 असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

तत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात रामानुजने आठवे मानांकन असलेल्या ईशान खांडेकरचा 13-15, 11-5, 15-13, 11-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तर शौरेनने दुसरे मानांकन असलेल्या अभिराज सकपाळचा 5-11, 15-13, 11-8, 11-5 असा पराभव करत अंतम फेरीत धडक मारली होती. दरम्यान चुरशीच्या अंतिम सामन्यात वैभव दहीभाते आणि दीपक कदम या दुसरी मानांकन असलेल्या जोडीने आदर्श गोपाल आणि करण कुकरेजा या अग्रमानांकित जोडीचा 15-13, 11-9, 7-1, 7-11, 11-8 असा पराभव करताना पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button