breaking-newsक्रिडा

टीम इंडियासमोर आजपासून काबूल एक्‍स्प्रेसचे आव्हान

भारत-अफगाणिस्तान ऐतिहासिक पहिल्या कसोटीला आज प्रारंभ 
बंगळुरू – जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ आणि पहिलीवहिली कसोटी खेळणारा अफगाणिस्तान संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्याला आज प्रारंभ होत असून पुराणकाळातील डेव्हिड विरुद्ध गोलियाथ या कथेचीच आठवण व्हावी असा दोन टोकाच्या संघांमधील हा सामना आहे. अर्थात या कसोटी सामन्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे हेही निश्‍चित. जगभरातील असंख्य क्रीडाशौकीन उद्याच सुरू होत असलेल्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेची प्रतीक्षा करीत असून त्यांच्यासमोर आता मेस्सी, रोनाल्डो किंवा नेमार अशा असामान्य फुटबॉलपटूंच्या अद्‌भुत कौशल्याचा अनुभव घेण्याचेच लक्ष्य आहे. तरीही काही अस्सल क्रिकेटशौकीन मात्र रशीद खान विरुद्ध शिखर धवन किंवा मुजीब उर रेहमान विरुद्ध अजिंक्‍य रहाणे यांच्यातील लढतीचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत.

अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असल्याच्या घटनेलाही अनेक राजकीय आणि सामाजिक पैलूंची पार्श्‍वभूमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युद्धामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानच्या सामाजिक जीवनाची अवस्था काय असू शकेल, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळेच क्रिकेटपलीकडे जाऊन या कसोटी सामन्याला आणखी वेगळे संदर्भ आहेत. अफगाणिस्तानमधील कोट्यवधी नागरिक दैनंदिन जीवनातील राक्षसी समस्यांमधून मार्ग काढताना रशीद खान, झादरान बंधू किंवा मोहम्मद शेहझाद या खेळाडूंच्या क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीतून दिलासा शोधत आहेत. युद्धजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला विविध माध्यमांमधून खूपच साहाय्य केले आहे. बीसीसीआयने देखील अफगाणिस्तानच्या संघाच्या सरावासाठी आपल्या स्टेडियमची दारे उघडून दिली आहेत. इतकेच नव्हे तर अन्य देशांशी मित्रत्वाच्या लढती खेळण्याकरिताही बीसीसीआयने आपली स्टेडियम अफगाण संघाला उपलब्ध करून दिली आहेत.

प्रतिस्पर्धी संघ- 
भारत– अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा व उमेश यादव.

अफगाणिस्तान – असगर स्तानिकझाई(कर्णधार), मोहम्मद शेहझाद, जावेद अहमदी, रहमत शाह, इहसानुल्लाह जानत, नासिर जमाल, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर झाझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, झहीर खान, आमिर हमझा होटक, सईद अहमद शिरझाद, यामिन अहमदझाई वफादार व मुजीब उर रेहमान.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button