Ola Electric : तब्बल ३५ हजारहून अधिक इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक हा भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांपैकी सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर ब्रॅण्ड आहे. ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सना मार्केटमध्ये भलतीच प्रसिद्धी मिळत आहे. आता या कंपनीने मोठा विक्रम केल्याचं समोर आलं आहे. या विक्रमाबाबत ओला कंपनीने अधिकृत घोषणा केली होती.
ओला इलेक्ट्रिकने आता एका महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर मे महिन्यामध्ये सुमारे ३५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री ही कंपनीने केली आहे. बंगळुरूत असणाऱ्या या कंपनीचे भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर प्रभागामधील मार्केट शेअर्स ३० टक्क्यांनी वाढले आहेत. सलग ९ महिने सर्वाधिक ई-स्कूटर्स विकणारी ‘ओला इलेक्ट्रिक’ ही एकमेव कंपनी आहे.
हेही वाचा – ‘राज्याच्या विकासात तेलंगणातील लोकांचे योगदान मोठे’; राज्यपाल रमेश बैस
कंपनीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात त्यांनी 30,000 पेक्षा जास्त स्कूटर्स विकल्या होत्या. कंपनीने ई-स्कूटर्स विक्रीमध्ये ३०० टक्के वाढ केल्याचीही माहिती आहे. दरम्यान केंद्र सरकारने १ जूनपासून फेम-२ सबसिडीमध्ये घट करण्याचे आदेश दिल्याने ओलासह EV क्षेत्रात असणाऱ्या बऱ्याच कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतींमध्ये आता वाढ केली आहे.