TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

ट्रम्प यांचा जेन्सन हुआंग यांना पाठिंबा; ‘एनव्हिडियाच्या CEO पदावर त्यांनी कायम राहावे’

चिनी गुप्तहेर संस्थेशी संबंधित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या वृत्तांनंतर हुआंग यांची कबुली; पत्नी आणि कुटुंबीयांची पत्राद्वारे मागितली माफी

अमेरिका : एनव्हिडिया कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सन हुआंग यांच्या कथित वैयक्तिक संबंधांवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. हुआंग हे चांगले व्यक्ती असल्याचे सांगतानाच त्यांनी एनव्हिडियाच्या प्रमुखपदी कायम राहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी याबाबत त्यांच्याशी बोललेलो नाही. मला एवढेच माहीत आहे की ते चांगले व्यक्ती आहेत. मात्र, आत काय सुरू आहे, हे सांगता येत नाही.”

हुआंग यांनी एनव्हिडियाच्या CEO पदावर कायम राहावे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प यांनी, “मला तसे वाटते. हो, नक्कीच,” असे उत्तर दिले. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया दौऱ्यात हुआंग यांना सोबत नेण्याबाबत विचारले असता, ट्रम्प यांनी याबाबत अद्याप निश्चित निर्णय नसल्याचे सांगितले. “त्यांनी काही चुकीचे केल्याचे माझ्या कानावर आलेले नाही,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, हुआंग यांचे एका संशयित चिनी गुप्तहेराशी संबंधित महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या वृत्तांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणाची एनव्हिडियाच्या संचालक मंडळाकडून चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. मेगास्पीड इंटरनॅशनलच्या माजी कार्यकारी अधिकारी ॲलिस हुआंग यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे काही अहवालांत म्हटले आहे. अमेरिकन सरकारला त्यांच्या चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी कथित संबंधांबाबत संशय असल्याचेही वृत्त आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी यापूर्वी ट्रम्प प्रशासनाला माहिती दिली होती की, हुआंग यांच्या जवळच्या संपर्कातील एक महिला चिनी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होती. हुआंग यांच्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी तिला नियुक्त करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.

हेही वाचा –  गोकुळच्या तज्ज्ञ संचालक नियुक्तीविरोधात कोल्हापुरात संताप; सतेज पाटील यांच्या मोर्चासाठी दसरा चौकात जय्यत तयारी

जेन्सन हुआंग यांनी पत्नीची मागितली माफी

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जेन्सन हुआंग यांनी आपल्या कुटुंबीयांची माफी मागितल्याचे वृत्त आहे. एका पत्राद्वारे त्यांनी पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली देत आपल्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला.

“मी माझ्या कुटुंबाची आणि तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. मी माझ्या पत्नीशी प्रतारणा केली आहे. माझ्या कृत्यामुळे तिला आणि आमच्या मुलांना त्रास झाला. मी केलेल्या कृतीचे कोणतेही समर्थन नाही. मला मनापासून खेद वाटतो,” असे त्यांनी पत्रात म्हटल्याचे सांगितले जाते.

आपल्या कुटुंबाने नेहमीच प्रेम आणि पाठिंबा दिला, मात्र आपण त्यांचा विश्वासघात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या कृतींची आणि त्यामुळे कुटुंबाला झालेल्या त्रासाची पूर्ण जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ माफी मागून झालेले नुकसान भरून निघणार नसल्याची जाणीव असल्याचे सांगत, कुटुंबाचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group