लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी
![Mumbai Municipal Corporation ready to vaccinate children in the age group of 15 to 18 years, waiting for the Centre's regulations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Vaccine-1-2.jpg)
पुणे – नोव्हावॅक्स कंपनीने शोधून काढलेली आणि कंपनीच्या परवानगीने पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोवोव्हॅक्स या १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या तातडीच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे, अशी माहिती सीरमचे अदार पूनावाला यांनी केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने जगात धुमाकूळ घातला असताना त्यात मिळालेली ही दिलासादायक बातमी आहे. ही लस अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला आणखी बळकटी मिळेल आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
१२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सीरमने उत्पादित केलेल्या कोवोव्हॅक्स या लसीच्या तातडीच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे. या लसीच्या घेतलेल्या चाचणीत ती अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे आढळले आहे. त्यानंतर या लसीच्या वापराला परवानगी मिळावी यासाठी डब्ल्यूएचओकडे अर्ज केला होता. त्यानुसार तिच्या तातडीच्या वापराला डब्ल्यूएचओने परवानगी दिली आहे. त्याबद्दल अदार पूनावाला यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हा आणखी एक मैलाचा दगड आहे, असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. इंडोनेशिया आणि फिलिपाईन्समध्ये या लसीच्या तातडीच्या वापराला परवानगी मिळाली होती. त्यानंतर आता डब्ल्यूएचओने तिला परवानगी दिल्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे, असे पूनावाला यांनी सांगितले. केंद्र सरकारने यापूर्वी या लसीच्या ५ कोटी डोसच्या निर्यातीला परवानगी दिली होती. त्यात इंडोनेशियाच्या ५० लाख लसीच्या कुप्यांचा समावेश आहे. सीरमने या लसीचा तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळावी. अशी मागणी गेल्या मेमध्ये डीसीजीआयकडे केली होती. ती मिळाली नाही तर डिसेंबर २०२१ पर्यंत या लसीचे एक कोटी डोस वाया जातील, असे सीरमने म्हटले होते.