पीएमटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे बसमधून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू
![Woman dies after falling from bus due to PMT driver's negligence](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/thebridgechronicle_import_s3fs-public_news-story_cover-images_21Ambulance_20new_2.jpg)
पुणे – बस थांबवण्यास सांगितले असतानाही पीएमटी चालकाने बस न थांबवता घाईघाईने तशीच पुढे घेऊन गेल्याने बसच्या दरवाज्यात उभ्या असणाऱ्या महिलेचा खाली पडून मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी गावाजवळ हा प्रकार घडला.
महादेवी गोरख गायकवाड (वय 23, रा. पवार मळा वडकी नाला) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण शिवाजी कड (वय 44) या बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी महादेवी गायकवाड या पीएमपी बसने प्रवास करीत असताना वडकी गावचे हद्दीत धनलक्ष्मी वजन काटा जवळ त्यांनी बस चालकाला बस थांबविण्यासाठी सांगितले होते. परंतु चालकाने बस न थांबवता घाईघाईने आणि अविचाराने बस तशीच पुढे नेली. यावेळी बस चा दरवाजा निष्काळजीपणाने उघडा ठेवल्याने महादेवी गायकवाड या बसमधून खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.