‘एसटीआय’ची पदे वाढणार? आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती…

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा २०२५ ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेद्वारे विक्री कर निरीक्षक (एसटीआय) या पदाच्या २७९ जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, त्यात खुल्या प्रवर्गासाठी जागांचा समावेश नाही. या अनुषंगाने आमदार अभिमन्यब पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन एसटीआय पदांचे अतिरिक्त मागणीपत्र पाठवण्याची मागणी केली.
‘विक्री कर निरीक्षक’ (एसटीआय) पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्द्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा २०२५ ची जाहिरात जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत एसटीआय च्या २७९ पदांचा समावेश असून यापैकी सर्व २७९ पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती
ओपन प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन “महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब २०२५ भरती प्रक्रियेसाठी एसटीआय पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत” अशी विनंती केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत,’ असे एक्स समाजमाध्यमातील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब २०२५ या परीक्षेची जाहिरात जुलै २०२५मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पीएसआय पदासह विविध संवर्गातील ६७४ पदांचा समावेश आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होण्यास सात महिने विलंब झाला, वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने काही दिवसांच्या फरकाने हजारो उमेदवारांची संधी हिरावली जात आहे. शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गृह विभागाअंतर्गत असलेल्या पीएआय पदाच्या वयोमर्यादेसाठी एक वर्षाची सवलत देऊन वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या बाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी समाजमाध्यमांत मागणीही केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या बाबत आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे पीएसआयच्या वयोमर्यादा वाढीचा निर्णय होणार की नाही, हा प्रश्न कायम आहे.




