आधी घेतली कौमार्य चाचणी, मुलगी झाल्यानंतर माहेरी पाठवले; पुण्यातील घटनेने खळबळ
![Virginity test taken earlier, sent to Maheri after having a daughter; Excitement over the incident in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/crime-registered-patangbaj_202101544305-e1625639033763.jpg)
पुणे | पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका घटनेने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतली आणि त्यानंतर तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. इतकेच नाही तर तिला मुलगी झाल्यानंतर माहेरी पाठवले आणि त्यानंतर तिच्याशी संपर्क तोडला. पुणे शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी एका 25 वर्षीय विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती तसेच सासू-सासऱ्यांसह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लग्नानंतर फिर्यादी या पती आणि सासू सासरे यासह राहत होत्या. परंतु पतीने लग्नानंतर तिची कौमार्य चाचणी घेतली. वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील केला. परंतु जेव्हा फिर्यादी तरुणीला मुलगी झाली तेव्हा पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेत उपाशी ठेवले. इतकेच नाही तर तिला माहेरी पाठवले आणि तिच्या सोबतचे सर्व संबंध तोडून टाकले.
त्यादरम्यान पती व त्याच्या कुटूंबाने राहत असलेले घर सोडून दुसऱ्याठिकाणी राहण्यास गेले. घेऊन जाण्यास पती येत नसल्याने विवाहिता स्वत: परत आल्या असता त्यांना राहते घर बदलल्याचे समजले. तिच्या कुटूंबाने फोन केल्यानंतर त्यांचे फोन न उचलता मानसिक व शारिरीक छळकरून फसवणूक केली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.