वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद
![Varandha Ghat road is completely closed for heavy traffic during rainy season](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Varandha-Ghat-780x470.jpg)
पुणे | भोर- महाड वरंधा घाट प्रमुख राज्य महामार्ग क्र.१५ (नवीन अधिसूचित पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी) वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळा कालावधीत २६ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केली आहे.
या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.