मोटार तपासणीसाठी येताना गणवेश अनिवार्य

पुणे : ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असताना पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) आणि खाकी रंगाची पँट असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. तर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश असणे आवश्यक असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना गणेश परिधान करण्याचा आदेश नुकताच काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘पुण्यात रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
एवढेच नव्हे तर ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करून आपली गैरसोय टाळावी, असे आवाहनही आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले.
ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनांची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले.