Pune | सिंहगडावरुन बेपत्ता झालेला तरुण अखेर चार दिवसांनी सापडला

पुणे | पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गेल्या बुधवारी (२० ऑगस्ट) मित्रांसह फिरायला आलेला २४ वर्षीय गौतम गायकवाड हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. पाच दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर त्याचा शोध घेण्यात यश आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असेल्या गौतम गायकवाडचा शोध लागला असून पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्याला शोधलं आहे. रविवारी (२४ ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गौतम सापडला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गौतम गायकवाड हा मूळचा साताऱ्यातील फलटण येथील असून, सध्या तो हैदराबाद येथे राहतो आणि तिथे एक कॅफे चालवतो. २० ऑगस्ट रोजी तो चार मित्र आणि एका मैत्रिणीसह सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता. सायंकाळी तानाजी कडा परिसरात तो लघुशंकेसाठी जातो, असे सांगून गेला, परंतु तो परतलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. यानंतर मित्रांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
हेही वाचा : जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी: प्रा. राव तुमाला
शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या CCTV फुटेजचा आधार घेतला. या फुटेजमधून गौतम पळताना आणि लपताना दिसल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले. सुरुवातीला तो दरीत पडल्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु CCTV फुटेजमुळे पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने वळला. अखेर रविवारी संध्याकाळी स्थानिकांच्या मदतीने गौतमचा शोध लागला. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगाडे यांनी सांगितले, “गौतम गायकवाड सापडला आहे, आणि त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीनंतर तो कुठे होता आणि का बेपत्ता झाला, याबाबत अधिक माहिती मिळेल.” पोलिसांनी या प्रकरणात गौतमने जाणूनबुजून गायब होण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त केला आहे, परंतु याबाबत ठोस माहिती चौकशीनंतरच समोर येईल.





