पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी ताब्यात
![The accused who attacked a police officer with a coyote in Pune is in custody](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Pune-5-780x470.jpg)
पुणे | ससाणे नगर रेल्वे गेट शेजारी रामटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वानवडीचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पिंगळे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.
निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहूलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दुचाकी अपघातातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या सपोनि रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाक व राहूलसिंग भोंड यांनी कोयता फेकून जखमी केले होते.
हेही वाचा – राज्यभरात पावसाचा जोर वाढला, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
आरोपी निहालसिंग टाक व राहूलसिंग भोंड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. आरोपींना अटक करणे अनिर्वाय झाले असताना पुण्यातील गुन्हेगारीचा सातबारा तोंडपाठ असणारे धडाकेबाज, राष्ट्रपदी पदक प्राप्त गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना सोलापूर येथून ताब्यात घेण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली.