भीषण अपघात: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पिकअप-ट्रकच्या अपघातात एक ठार
![Terrible accident: One killed in Mumbai-Pune expressway pickup-truck accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Terrible-accident.png)
पुणे (लोणावळा)| कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपची पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात १ जण ठार आणि २ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवलीजवळील देवले गावाच्या हद्दीतील पुलाजवळ झाला. इजाक रसुल मुगले (वय ४२, रा. उमरगा, उस्मानाबाद) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. नागेश काशीनाथ करमुखले (वय ३२) आणि इरफान जब्बार मकाने (वय २५, दोघेही रा. शिळफाटा, ठाणे) अशी जखमींची नावे आहेत.
असा झाला अपघात
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुगले उस्मानाबादहून मुंबईकडे पिकअपमधून कोंबड्या घेऊन जात होते. देवले गावाच्या हद्दीत त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पुढे जाणाऱ्या ट्रकवर धडकली. यामध्ये मुगले यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिस व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.