तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी : आमदार सुनील शेळके
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार
तळेगावः प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी च्या कामाच्या मसुदा एमएसआयडीसीकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्याविषयी मावळचे आमदार सुनील शेळके, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२२) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची एमएसआयडीसीच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
बैठकीत एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित म्हणाले कि, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर,मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी यासांदर्भात एमएसआयडीसीकडून गेल्या १ जानेवारी रोजी प्रारुप मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.त्याला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने सुरु करण्यात येईल.सदर कामाबाबत कृती समितीचे पदाधिकारी करीत असलेल्या पाठपुराव्याचे दीक्षित यांनी तोंडभरुन कौतुक केले. मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले कि,आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे.कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी आहे असे शेळके यांनी सांगितले.
सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी दीक्षित यांना विचारले असता,ऑन रेकॉर्ड हा रस्ता भारतीय राजमार्ग प्राधिकरणकडेच आहे.कॅबिनेट मंजुरीनंतर निधी उपलब्ध होताच वाहतूक कोंडीवर उपायोजना केल्या जातील असे दीक्षित यांनी सांगितले.
हेही वाचा : शेतकरी कुटुंबातील आयटीएन्स धनेश इंदोरे याचा प्रवास प्रेरणादायी!
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे,उपाध्यक्ष दिलीप डोळस,सचिव अमित प्रभावळकर ,सदस्य संजय चव्हाण,प्रमोद दाभाडे आणि मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित पुणे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग-७५३ ला जोडणारा ५३ किमीचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग हा पुणे शहराकरिता बाह्यवळण मार्ग म्हणून उपयोगी पडणारा आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने वाहनांना बराच काळ लागतो.सदर दुपदरी मार्गाचे चार पदरी उन्नत मार्गात बांधकाम करण्यासह आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने केले आहे.त्यासाठी आवश्यक एकूण रुपये साडेसहा हजार कोटीचा निधी पथकर गुंतवणुकीच्या द्वारे ई.पी.सी. तत्त्वावर विकसित करणेबाबत किंवा अथवा बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बी.ओ.टी,) तत्त्वावर आवश्यक निविदा कार्यवाही उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत करण्यात यावी.
प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर चार पदरी उन्नत मार्ग आणि सध्याच्या अस्तित्वातील दोन पदरी रस्त्याचे उड्डाणपूल बांधकामाचे उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत पथकर प्रणालीद्वारे करण्यास मंजुरी देणे. भारतीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनात तात्काळ सामंजस्य करार करुन ३० वर्षांसाठी सवलत कारनामा करुन सर्वसामावेशक कार्यकारी समिती गठीत करावी.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या पथकर धोरणांनुसार एमएसआयडीसीमार्फत पथकर लावून या रस्त्याची सुधारणा करण्यास मान्यता द्यावी आर्थिकदृष्ट्या सुसाध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर,मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी आणि सदर कामासाठी ४१ हेक्टर भूसंपादनासाठी १० कोटीं प्रति हेक्टर असा एकूण ४१० कोटींचा निधी उपलब्ध करुन दयावा. सदर मार्ग हरित मार्ग म्हणून विकसित करून त्याद्वारे कार्बन क्रेडिट प्राप्त करुन आर्थिक सुधारणा सुलभता एमएसआयडीसीने तपासावी. या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलावीत आदी बाबी या मसुद्यात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.