ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना वरुणराज भिडे पुरस्कार!
पुण्यातील प्रशांत आहेर यांच्यासह शिंदे, घई यांचाही गौरव

पुणे : ‘पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळा’तर्फे देण्यात येणारा वरुणराज भिडे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे विशेष वार्ताहर यदू जोशी यांना जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांना ‘आश्वासक पत्रकार’ पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्यासह सांगली येथील दिगंबर शिंदे (लोकसत्ता) आणि पुण्यातील मिकी घई (एबीपी माझा) यांनाही ‘आश्वासक पत्रकार’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ येत्या २८ एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार ‘वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारा’चे हे २३ वे वर्ष आहे. मराठी पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारांस मुख्य पुरस्कार देण्यात येतो; तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना ‘आश्वासक पत्रकारिता’ पुरस्कार देण्यात येतो. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे मुख्य पुरस्काराचे स्वरूप आहे, तर दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आश्वासक पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती वरुणराज भिडे मित्र मंडळाचे विश्वस्त अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई आणि संस्थेचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली.
हेही वाचा – केशरी रेशनकार्डला लाखाची मर्यादा
पुरस्काराच्या निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, विजय बाविसकर; तसेच प्रसार माध्यमातील अरुण मेहेत्रे यांची समिती नेमण्यात आली होती. समन्वयक म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात दर वर्षी प्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीकेच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेला विद्यार्थी आणि चालू घडामोडी या विषयांत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याला ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय कार्यालय’ तर्फे भिडे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.