पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी रणजीत तावरेंची निवड, कोण आहेत रणजित तावरे?
![Selection of Ranjit Taware as Director of Pune District Central Bank](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Ranjit-Taware-780x470.jpg)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संचालकपदी रणजित तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे संचालक पद रिक्त झाले होते. त्यानंतर संचालक पदासाठी निवडणुक जाहीर केल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ११ वाजता होती. त्यावेळी रणजीत अशोक तावरे यांचा एकमेव अर्ज आल्याने, ही निवडणूक बिनविरोध होती. रणजीत अशोक तावरे यांची संचालक पदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
कोण आहेत रणजीत तावरे?
बारामती तालुक्यातील माळेगावच्या बाळासाहेब तावरे यांचे ते पुतणे आहेत. रणजित अशोक तावरे हे व्यवसायाने मोठे उद्योजक आहेत. पुण्यात त्यांची १५ टाटाची शोरूम आणि पेट्रोल पम्प आहेत. त्यासोबत छोटे मोठे व्यवसाय पण आहेत. त्यासोबत गेली ५ वर्ष ते राजहंस दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. बरोबरच प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून दोन वर्ष काम पाहत आले आहेत.