शाळा नोंदणीसाठी आजपासून मुहूर्त, जानेवारीतच विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया
पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागावरील बालकांच्या प्रवेशासाठी आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणीची प्रक्रिया बुधवार ( दि.१८) पासून सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला मुहुर्त सापडला आहे.
हेही वाचा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ अपघातात बिबट्याचा मृत्यू
दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात काही ना काही अडथळे येत असतात. त्यामुळे प्रक्रियेच उशीर होत असतो. हे टाळण्यासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी पालकांना संधी देण्यात येणार आहे. प्रवेशाची लॉटरी जाहीर करून मार्चमध्ये बालकांची निवड यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा पहिल्यांदाच जून-जुलैमध्ये संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे नियमित वेळेत आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांचे वर्गही सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळा नोंदणीसाठी साधारण ३ आठवड्यांचा कालावधी दिली जाईल. ही शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तत्काळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बालकांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय