राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी वाढल्या!
आंबेडकरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल पुण्यात तक्रार दाखल
![Rahul Solapurkar, problems, increased, Ambedkar, controversial, comments, complaints, filed,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/solapurker-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडनं तक्रार दाखल केली आहे. सोलापूर यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं आपल्या तक्रारीत केली आहे. पण यासंदर्भात अद्याप पोलिसांनी पुढील कार्यवाही केलेली नाही.
काय आहे प्रकरण?
राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली आहेत. यापूर्वी शिवरायांबाबत त्यांनी केलेल्या विधानामुळं राज्यात वादळ उठलं होतं. त्यानंतर याच पॉडकास्टमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांबाबतही केलेल्या विधानामुळं त्यांच्यावर टीका होत आहे.
शिवाजी महाराज आग्र्यामध्ये असताना त्यांनी आपल्या सुटकेसाठी मुघलांच्या सैन्याला लाच दिली होती, असं त्यांनी म्हटलं होतं. तर आंबेडकरांबाबत बोलताना त्यांनी वेदांच्या संदर्भानं बाबासाहेबांचं एक उदाहरण दिलं. व्यक्ती आपल्या जातीनं नव्हे तर कर्मानं ब्राह्मण, क्षत्रिय ठरते. त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं.
हेही वाचा – शहरातील कोणत्याही भागातून मिळणार विमानतळासाठी मेट्रोची कनेक्टिव्हीटी
पण राहुल सोलापूरकर यांनी या दोन्ही महापुरुषांबाबत चुकीचे संदर्भ दिलेले असून यासाठी त्यांना अटक करुन त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी लोकांकडून होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवप्रेमी आणि आंबेडकर प्रेमींनी आंदोलन केलं. आपल्याविरोधात वाढत असलेला विरोध पाहता सोलापूरकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या दोन्ही महापुरुषांची बदनामी करण्याचा आपला हेतू नव्हता, असं सांगत जाहीर माफी मागितली आहे.
दरम्यान, सालापूरकर यांनी प्रकरण अंगलट आल्यानंतर जरी माफी मागितली असली तरी त्यांनी या महापुरुषांबाबत बोलावच का? ते जाणीवपूर्वक अशी विधानं करुन समाजात द्वेष परसरवत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच शिवरायांबाबत केलेल्या विधानाविरोधात सोलापूरकर यांच्याविरोधात उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.