पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत त्रुटींचा भडिमार; ३ दिवसांत ३,३४३ तक्रारी

पुणे | महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळू लागल्याने नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. वाढत्या हरकती आणि दुरुस्तीच्या मागण्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ही माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर फक्त काही दिवसांतच ३,३४३ त्रुटी व हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. दुबार नावे, चुकीच्या प्रभागात नावांची नोंद, अगदी इतर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातही मतदारांची नावे गेल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी मुदतवाढीचे आदेश काढले आहेत. गेल्या आठवड्यात महापालिकेने प्रारूप मतदारयादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत अनेक मतदारांची नावे दुबार झाली असून, काही मतदारांची नावे केवळ आजूबाजूच्या प्रभागात नव्हे, तर दुसऱ्याच विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील याद्यांमध्ये आल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मतदारयादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वत:हून याद्यांची तपासणी सुरू केली आहे. मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना वापरण्यात आलेल्या संगणकीय यंत्रणेमुळे याद्यांची विभागणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.
हेही वाचा : आयआयटी बॉम्बेचे ‘मुंबई’ करा, केंद्राला पत्र पाठवू !
या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात होती. राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील राज्यातील अनेक महापालिकेच्या मतदारयाद्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदारयादीच्या कार्यक्रमात बदल केला आहे.
मतदारयादीवर हरकती, त्रुटी नोंदविण्याची मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर अंतिम मतदारयादी जाहीर करण्याची मुदत पाच दिवसांनी वाढविली आहे. मतदान केंद्रांची यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, मतदान केंद्रनिहाय यादी २२ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
‘कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बिनचूक काम करावे’
मतदारयाद्यांतील त्रुटीबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी महापालिकेतील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत ‘सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिनचूक काम करावे,’ अशा सूचना राम यांनी दिल्या. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य अत्यंत कमी असते. त्यामुळे लक्ष केंद्रित करून मतदारयादी त्रुटीमुक्त कशी होईल, याकडे लक्ष द्यावे,’ असे राम यांनी बैठकीत स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तर काही भागात महापालिकेते अधिकारी स्वत:हून चौकशी करून चुकीची नावे रद्द करत आहेत. ज्या मतदारांची नावे इतर प्रभागांत गेली आहेत. त्याची शहानिशा सुरू आहे. त्रुटीमुक्त मतदारयादी तयार केली जाईल, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले.




