प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोची खास भेट; अवघ्या २० रुपयांत मिळणार ‘ही’ सेवा

पुणे : मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी एक खास योजना जाहीर करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी ‘वन पुणे ट्रांजिट कार्ड’ अवघ्या २० रुपयांत उपलब्ध असेल. सामान्यतः ११८ रुपयांना मिळणारे हे कार्ड प्रजासत्ताक दिनी फक्त २० रुपयांत खरेदी करता येणार आहे.
महामेट्रोचे ‘वन पुणे ट्रांजिट कार्ड’ हे पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे प्रीपेड कार्ड असून, ते बहुउद्देशीय आहे. या कार्डच्या माध्यमातून मेट्रोच्या प्रवासात सोमवार ते शुक्रवार दरम्यान १० टक्के तर शनिवार आणि रविवारच्या प्रवासासाठी ३० टक्के सवलत मिळेल.
हेही वाचा : पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे
हे कार्ड घेण्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची आवश्यकता भासणार नाही. प्रवाशांना आपल्या जवळच्या मेट्रो स्टेशनवर जाऊन हे कार्ड सहज मिळणार आहे. मेट्रोच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पुणे मेट्रोने एक ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पुणे मेट्रोच्या ट्विटमध्ये नक्की काय सांगितलं आहे?
“पुणे मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रवाशांना पुणे मेट्रोने प्रवास अधिक सुलभ व जलद करता यावा याउद्देशाने पुणे मेट्रोचे ‘एक पुणे ट्रांझिट कार्ड’ २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी पहिल्या ५००० प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह उपलब्ध असतील. नेहमी ११८ रुपये शुल्क असणारे हे कार्ड प्रवाशांसाठी केवळ २० रुपयांत उपलब्ध असणार आहेत. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. आपल्या जवळच्या पुणे मेट्रो स्थानकाला भेट द्या आणि आपले कार्ड प्राप्त करा!”




