PUNE । जेजुरीच्या खंडोबादेवाची विदेशी पर्यटकांना भुरळ; दक्षणा पेटीत आढळल्या अमेरिकन नोटा!
दक्षणेत विदेशी चलन; खंडोबा देवस्थानी जागतिक भाविकांची वाढती उपस्थिती

पुरंदर : भारतीय लोकदैवत आणि महाराष्ट्रातील कुलदैवत म्हणून खंडोबादेवाचे जेजुरी गडावरचे स्थान अनन्यसाधारण आहे. या गडावरील देवस्थान, भंडारा उधळण्याची अनोखी परंपरा आणि ऐतिहासिक महाखंडा तलवार यांचे आकर्षण केवळ राज्य व देशातील भाविकांपुरते मर्यादित नसून जगभरातील पर्यटकांनाही या लोकदैवताचा मोह पडताना दिसतो.
अलीकडेच देवस्थानच्या दक्षणा पेट्या मोजणीदरम्यान अमेरिकन डॉलरच्या नोटा आढळल्याने विदेशी भाविकांच्या वाढत्या उपस्थितीची पुष्टीच झाली. देवस्थान व्यवस्थापक आशिष बाठे यांनी यासंदर्भात माहिती देताना, “विविध देशांच्या चलनांच्या नोटा वेळोवेळी दक्षणा स्वरूपात आढळतात. त्या भाविकांच्या श्रद्धेचा पुरावा आहे,” असे सांगितले.
अमेरिकेच्या ऑर्लॅन्डो, फ्लोरिडा येथे राहणारे एमआयटी स्लोन स्कूल व्यवस्थापक रमेश बी.के. आणि प्रख्यात व्हॉईस-अभिनेत्री प्रोफेसर सॅनड्रा क्रासा यांनी नुकतीच जेजुरीला भेट देऊन खंडोबाचे दर्शन घेतले. देवळात ठेवलेल्या ४२ किलो वजनाच्या ऐतिहासिक महाखंडा तलवारीचे त्यांनी प्रत्यक्ष हाताळून दर्शन घेतले. मंदिरातील सुवर्णसदृश पिवळ्या भंडाऱ्याची परंपरा, रिवाज आणि गडाची सांस्कृतिक ओळख पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्थानिक रिवाजनुसार सॅनड्रा क्रासा यांनी पतीला कडेवर घेऊन भंडाऱ्यात आनंद व्यक्त केला. देवस्थानतर्फे पीआरओ सागर गोडसे, बाळू खोमणे आणि भाटे यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले.
हेही वाचा – PUNE: जयाद्री खोऱ्यात डिसेंबरपासून ‘इला उलूक उत्सव’ उत्साहात सुरू!

जेजुरीचे जागतिक स्तरावरील आकर्षण नव्याने नाही. जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक व विख्यात इतिहास संशोधक कै. डॉ. गुंथर सोन्थ्यमर यांनी तब्बल १५ वर्षे जेजुरीत वास्तव करून ‘Khandoba – The Hunting God’ हा प्रबंध आणि माहितीपट तयार केला होता. रशिया, फ्रान्स, जपान, नेदरलँड्ससह अनेक देशांतील संशोधक, पर्यटक आणि भक्त दरवर्षी जेजुरी दर्शनास येत असतात.
तथापि, जागतिक वारसा लाभलेल्या या गडावरील माहितीपर सुविधा मात्र अत्यंत अपुऱ्या असल्याचेही चित्र समोर येत आहे. महत्त्वाची ऐतिहासिक तलवार अद्याप पत्र्याच्या पेटीतच ठेवलेली असून, देशी-विदेशी पर्यटकांसाठी हिंदी, इंग्रजी व इतर भाषांतील माहितीफलकांचा पूर्ण अभाव आहे. देवस्थान समिती जाहिरातबाजी व राजकीय नातेसंबंध जपण्यात गुंतून मूलभूत सुविधा दुर्लक्षित करत असल्याची स्थानिकांची नाराजी व्यक्त होत आहे. जेजुरी गडाचा जागतिक लौकिक वाढत असताना शासकीय व देवस्थान स्तरावर अधिक सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी मात्र अधिक तीव्र होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“जेजुरी खंडोबा देवस्थान हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित नाही. प्रत्येक वर्षी देश-विदेशातून हजारो भक्त येथे येतात. दक्षणा पेटीत वेळोवेळी अमेरिकन डॉलर तसेच युरोप, आशिया आणि इतर भागातून आलेल्या चलनांच्या नोटा आढळतात. हे फक्त आर्थिक मूल्य नाही, तर भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. आम्ही या सर्व वस्तू आदराने जतन करतो आणि या परंपरेत सातत्य राखण्याचा प्रयत्न करतो. तसेच, विदेशी पर्यटकांनी जेजुरीतील धार्मिक विधी, भंडारा आणि ऐतिहासिक तलवार महाखंडा अनुभवताना अनुभवलेली भावना पाहून आम्हाला खूप आनंद होतो,”
— आशिष बाठे, व्यवस्थापक, खंडोबा देवस्थान, जेजुरी.




