बलात्काराचा बनाव करत पन्नास लाखाची खंडणी मागितली
![Pretending to be a rapist, he demanded a ransom of Rs 50 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/fraud-1.jpg)
महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे न्यूज | एका 59 वर्षीय व्यक्तीला रस्त्याच्या आडबाजूला नेत बलात्काराचा बनाव केला आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे एका खाजगी बँकेत काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एका महिलेचा फोन आला आणि तिने फोनवरून त्यांची संपूर्ण खाजगी माहिती काढून घेतली. त्यानंतर तिने फिर्यादीला भेटण्यासाठी म्हणून पुण्यातीलच नारायणगाव परिसरात बोलावले. फिर्यादी त्या ठिकाणी आले असता या महिलेने त्यांना बाजूला नेले. त्यानंतर महिलेने काही वेळातच आपल्या पाच सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावले. तसेच फिर्यादीने आपल्यावर बलात्कार केल्याचे त्यांना खोटे सांगितले.
या सर्व प्रकारानंतर पाच आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या गळ्याला कुराड लावून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हे प्रकरण मिटवायचे असेल तर पन्नास लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यावर तडजोड करत फिर्यादीने तीस लाख रुपयाचे तीन चेक त्यांना लिहून दिले. दरम्यान हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.