पुण्यात राज ठाकरेंच्या विरोधात पोस्टरबाजी
![Poster campaign against Raj Thackeray in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Poster-campaign-against-Raj-Thackeray-in-Pune.png)
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला, आणि मशिदीवरील भोंगे यांचा आवाज कमी नाही झाला तर त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत देखील राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
हिंदुत्वाच्या भूमिकेकडे झुकलेल्या राज ठाकरे यांनी आपण ५ जूनला आयोध्या दौरा करणार असल्याचे देखील घोषित केले. राज ठाकरे यांच्या याच हिंदूत्वाच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या जुन्या एका व्यंगचित्राचा आधार घेत त्यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात येत आहे.
सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व…
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी एक व्यंगचित्र आपल्या समाज माध्यमावर प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि भाजपाला निशाण्यावर घेतलं होतं. त्या व्यंगचित्रावर, “अहो ! देश घातलाय खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे, लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते राम मंदिर नव्हे…” असे लिहिले होते. याच व्यंगचित्राचा आधार घेत राज ठाकरे यांच्याविरोधात पुण्यातील गुडलक चौकात बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनर वर लिहिण्यात आले की, “अशी वेळ कोणावरही येऊ नये . उद्धव साहेब ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिर ला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी आयोध्या जावेच लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व…” असा मजकूर लिहीत राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
काय म्हणाले सचिन सावंत…
दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी? असं ट्वीट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील राज ठाकरे यांनी काढलेले एक व्यंगचित्र ट्विट करत राज ठाकरेंना जुन्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.