TOP Newsताज्या घडामोडीपुणे

टीईटीत गैरप्रकार केलेले उमेदवार साडेनऊ हजारांवर

पुणे : शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या संख्या साडेनऊ हजारांवर गेली आहे. २०१८च्या टीईटीत १ हजार ६६३ उमेदवारांनी, तर २०१९च्या टीईटीत ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८च्या परीक्षेत संबंधित उमेदवार अपात्र ठरलेले असतानाही त्यांनी स्वत:ला पात्र करून घेतल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची या परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी २०१८च्या परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांवरील कारवाईची माहिती शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. २०१८मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासादरम्यान उमेदवारांच्या गुणपत्रिकांची कसून तपासणी केली असता १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ७७९ उमेदवार अपात्र असताना त्यांनी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर ८८४ उमेदवारांनी आरोपींच्या सहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे आढळून आले. या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करून परीक्षा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्य परीक्षा परिषदेने २०१९च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर आता २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीईटीत ९ हजार ५३७ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button