लोणावळ्यात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार ओबीसी चिंतन शिबिर
![OBC meditation camp will be held in Lonavla on OBC issues](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/obc.jpg)
लोणावळा |महाईन्यूज|
ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन आणि मंथन करण्यासाठी 26 आणि 27 जून रोजी ओबीसी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. हे शिबिर लोणावळ्यात होणार आहे. पक्षाचे राजकीय बंधन सोडून या शिबिरात सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि समर्पित कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती या शिबिराला राहणार आहे. या दोन दिवसीय शिबिरात राज्यभरातून 300 कार्यकर्ते सहभागी होणार असून चार सत्रात ते चालणार आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण, विदर्भातील आठ जिल्ह्यात कमी केलेलं आरक्षण, इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाची स्थापना असे अनेक प्रश्न या शिबिरात चर्चेला येणार आहेत. ओबीसींच्या पुढील वाटचालीची दिशा यातून निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.