‘आता गावकी भावकीची भांडण संपणार’; मुरलीधर मोहोळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-15-1-780x470.jpg)
पुणे : स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंब गावातील गावठाणाच्या जागेचे मालक झाले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, या योजनेमुळे गावकी भावकीची भांडण मिटणार आहेत आणि बहीण-भाऊ यांच्यातील वाद देखील होणार नाहीत, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.
पुण्यातील नागरिकांना स्वामित्व योजने अंतर्गत मोहोळ यांच्या हस्ते मालमत्ता सनद वाटप जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपसंचालक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – स्वामित्व योजनेमुळे जनतेच्या उत्पन्नात वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यासही मदत होणार आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने इंग्रजांनी ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष दिले नाही. यामुळे गावठाणातील जमिनीचे भूमापन कधीच झाले नव्हते. यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले.
हेही वाचा – सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर
आता, स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ड्रोनच्या मदतीने गावांचे सर्व्हे करण्यात आले आहे. बँकेचे कर्ज मिळत नव्हते. घरात, भावकीत वाद होत होते. स्वामित्व योजनेंतर्गत देण्यात आलेल्या मालमत्ता सनदीमुळे अनेक गोष्टी सुकर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.