घरगुती ग्राहकांना कमर्शियल वीजदर नाही; महावितरणचे स्पष्टिकरण

पुणे : सर्वसाधारण घरगुती ग्राहकांचा विजेचा वापर महिना ३०० युनिटपर्यंत असतो. अशा ग्राहकांच्या घरात एखाद्या खोलीत शिकवणी, ब्युटी पार्लर, वकिलाचे कार्यालय, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट अशा स्वरुपाचा व्यवसाय असेल आणि घरगुती वीजवापर ३०० युनिटपर्यंतच असेल अथवा वार्षिक ३६०० युनिटपर्यंत असेल, तर त्यांना घरगुती वीजदरच लागू होईल, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे आगामी पाच वर्षांसाठी वीजदर निश्चितीसाठीची याचिका दाखल केली आहे. यामध्ये घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्या टप्प्याने कपात करण्याचा तसेच दिवसाच्या वीज वापरासाठी अतिरिक्त सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, पश्चिम महाराष्ट्रातील काही ग्राहक व इतर संघटनांकडून वीजग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून घरगुती ग्राहकांना व्यावसायिक वीजदर नसेल असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – ‘पुरस्कार सोहळ्यातून नवोदितांना प्रेरणा मिळते’; पद्मश्री मुरलीकांत पेटकर
तथापि, व्यावसायिक वापरामुळे महिना ३०० युनिटच्या वर गेला, तर त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे सवलत मिळणार नाही व व्यावसायिक वापराचा वीजदर लागू होईल. हे सुद्धा आयोगाच्या तरतुदीनुसार आहे. जर एखादा ग्राहक एखाद्या खोलीच्या ऐवजी त्याच्या संपूर्ण घराचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत असेल तर मात्र त्याला घरगुतीची सवलत मिळणार नाही आणि व्यावसायिक दर लागू करावा, असा प्रस्ताव आहे. याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.