एम आय टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
शिक्षण विश्व: मराठी जतन-संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एम आय टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. मराठी भाषा जतन आणि संवर्धन या विषयावर शशांक मोहिते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
आपल्या व्याख्यानात शशांक मोहिते यांनी मराठी भाषा ही समृद्ध जीवनाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि विचारांचा वारसा जपणारी भाषा आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या मराठी भाषेतील अमूल्य योगदानाविषयी माहिती दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक; शासनाचे ‘लक्ष’ वेधले!

कार्यक्रमात एकूण १२४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निबंध स्पर्धेत तन्वी गोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर ऋतुजा पहाडे हिने द्वितीय आणि नेहा तांडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. कार्यक्रमादरम्यान संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी ‘माय मराठी’ ही इतर भाषांची जननी कशी आहे आणि आजच्या युवकांनी मराठी भाषा का आत्मसात करावी, याविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी सारिका पडवळ, आदर्श तांबे, रोहिणी पोकळे आणि सुवर्णा सानप यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. निशिगंधा भालेराव, डॉ. राहुल बाराथे आणि डॉ. सुनील महाजन यांनी केले. तसेच उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतिकार आणि संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान व आत्मीयता निर्माण झाली असून, मराठी भाषा संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“‘माय मराठी’ ही केवळ आपली मातृभाषा नाही, तर आपल्या संस्कृतीची ओळख आणि विचारांची ताकद आहे. जागतिकीकरणाच्या युगात इतर भाषा शिकणे आवश्यक असले, तरी मराठीचा अभिमान आणि वापर अबाधित ठेवणे ही प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.
– डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.




