क्रिडाताज्या घडामोडीपुणे

लई भारी जिंकलो!

पुणे : एखादा जबरदस्त थ्रिलिंग सस्पेन्स सिनेमा पाहाताना एक साधारण अपेक्षा अशी असते की, हा सिनेमा बघताना एकदा तरी आपण आपलीच नखं पोटभरून खाल्ली पाहिजेत. आणि खाण्यासाठी नखंही कमी पडली पाहिजेत, अशी परिस्थिती आल्यावर आपल्याला कशाचच भान राहत नाही. क्षणभर आपण स्वत:च नाव आणि सगळेच विसरून जातो. आणि त्याचा शेवट पाहिल्यावर जे समाधान मिळते त्या सुखाला आणि समाधानाला तोड नाही.

असच काहीस बार्बाडोस येथे झालेल्या २०/२० विश्व चषकातील भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या अंतिम सामन्याच्यावेळी वाटत होतं. शेवट पर्यंत म्हणजे अगदी मिलर चा तो सुर्यकुमार यादव याने घेतलेल्या अफलातून झेलापर्यंत आणि त्यानंतर शेवटच्या चेंडू पर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला रोमहर्षक अन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असं काहीतरी आपण बघतोय असं वाटत होतं.

आजपर्यंत असं नुसत वाचत आणि ऐकत होतो, की अमुक एक गोष्ट ही कमजोर हृदयाच्या लोकांसाठी नाही, वैगरे वैगरे, पण त्या गोष्टीचा प्रत्यय आज प्रथमच घेतला. खरच ही रोहित शर्मा च्या नेतृत्वाखालील भारतीय टीम ही अफाट गुणांनी भरलेली आहे. फलंदाजी म्हणू नका, गोलंदाजी म्हणू नका, क्षेत्ररक्षण म्हणू नका, या विश्वचषकामध्ये आपण सर्वच्या सर्व गोष्टी अगदी अचूक आणि निडर होऊन केल्या आहेत. जिंकण्याची ईर्ष्या सर्वतोपरी हाच मूळ उद्देश आणि याच्यानंतर दुनिया संपते हे डोळ्यात अन मनात साठवलेलं अन मुरवलेल वाक्य घेऊन अक्षरश: जीवाची बाजी लावणे म्हणजे हा विश्वविक्रम!

फलंदाजीत या विश्वचषकात रोहित शर्मा, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शेवटच्या सामन्यात ज्याने अफाट फलंदाजी केली तो म्हणजे विराट कोहली या सगळ्यांनी कमाल केली.

खर म्हणजे एक वाक्य क्रिकेट समीक्षकांना लिहायला नेहमी आवडतं, की हा संघाचा विजय आहे. हा संघाचा पराभव आहे. वैगरे वैगरे . पण हा भारतीय संघाचा झालेला विजय हा खरच संपूर्ण संघाचा विजयच आहे. संपूर्ण खेळलेल्या अकरा पैकी अकरा जणांनी यात स्वत:च कौशल्य दाखवून हा विजय खेचून आणला आहे. कुणी फलंदाजी केलीये, कुणी गोलंदाजीने कमाल दाखवलीये, कुणी अफाट क्षेत्ररक्षणाने सामना खेचून आणलाय आणि या सगळ्यात संघभावनेला सर्वोच्च प्राधान्य या आपल्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने दिलय. कुठेही स्वार्थ नाही, नसते हेवेदावे नाही. ड्रेसिंग रूम मध्ये कधीही कॅमेरा न्या सगळेजण एकत्र बसलेत अन आपल्या साथीदारांचा खेळ एन्जॉय करताहेत. मजा मस्ती चालू आहे. आणि याचे श्रेय जेवढे संघाला तेवढेच संपूर्ण संघव्यवस्थापनाला जाते. की त्यांनी ड्रेसिंग रूम मधील वातावरण हसत खेळत कस राहील हे पाहिलं. आणि त्या तशा मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे प्रत्येक खेळाडूला खूप काही चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळाली.

आता थोडे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा विषयी …

खरेखुरे विजयीवीर म्हणजे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाविषयी, खरतर या विश्वविजयाचे श्रेय बाकी खेळाडू न एवढेच या दोघानाही मिळायलाच हवे. जसे पराभवानंतर या दोन व्यक्तीना धारेवर धरले जाते तसे विजयात यांना वाटा मिळायलाच हवा. विशेषकरून प्रशिक्षक राहुल द्रविड ला तर नक्कीच, तो या अशा विजयासाठी फारच आतुर असणार, तसं म्हंटल तर आपल्या प्रशिक्षणाच्या कामाच्या शेवटच्या दिवशी त्याचा तो हक्कच होता. आजपर्यंत तो खेळत असतानाही त्याला अनेकदा यशाने त्याला हुलकावणी दिली आहे. विशेषत: तो जेव्हा कर्णधार होता, तेव्हा २००७ सालच्या वनडे विश्वचषकामध्ये भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यामध्ये राहुल द्रविड चा काहीच दोष नव्हता. अन तरीही अपयशाचे खापर कर्णधार म्हणून त्याच्यावरच फोडण्यात आले. त्याकाळात जे काही विजय आपल्याला मिळाले असतील त्याचे थेट श्रेय हे कधीच राहुल द्रविडला दिले गेले नाही. हा नियतीने त्याच्यावर केलेला अन्यायच होता.

पण नियतीने त्याची नुकसान भरपाई अगदी व्यवस्थित केली, ते त्याला २०/२० मध्ये विश्वविजय देऊन….. त्याचे नेतृत्व सक्षम होते आणि आहे, हेच आता इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाणार आहे. (आमच्यासारख्या राहुल द्रविड भक्तांना काल फारच भरून आले)

कर्णधार रोहित शर्माचीही तीच गोष्ट २०२३ च्या ५०-५० विश्वचषकामध्ये अंतिम सामन्यात जो पराभव झाला होता आणि त्या आधी world test championship मध्ये जे यशाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर चाहते प्रश्नचिन्ह लावत होते. मात्र त्या सगळ्याची भरपाई याने आता झाली आहे. रोहित विराट यांनी दोघांनी या विजयानंतर नवीन खेळाडूना प्रोत्साहन म्हणून दोघांनीही २०-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे दोघे आता कसोटी आणि वन डे हे दोनच क्रिकेट चे प्रकार खेळणार आहेत. आणि तमाम भारतीयाना या विश्वविजयानंतर खात्री आहे की हे दोघे सर्वच खेळाच्या प्रकारामध्ये हे असेच दैदीप्यमान कामगिरी करून यशाचा आलेख उंचावतच जाणार आहे.

आणि त्या अर्थाने “यह तो सिर्फ झांकी है, और मंझिले अभी बांकी है!

लेखक : हर्षल आल्पे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button