कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांचा गावभेट दौरा सुरू

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ – सुस, बाणेर, पाषाण येथे व्यापक गाव भेट दौऱ्याला आज प्रारंभ झाला. कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी महाळुंगे येथील भैरवनाथ मंदिराच्या दर्शनाने या दौऱ्याची औपचारिक सुरुवात केली.
दौऱ्याच्या प्रारंभी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, सहकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आत्मीय स्वागताने गावातील स्नेह, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे बालवडकर यांनी सांगितले.
गाव भेटीदरम्यान त्यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची विचारपूस केली, त्यांच्या अडचणी आणि तातडीने सोडवावयाच्या प्रश्नांची माहिती घेतली. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार संधी अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रत्यक्ष संवाद साधला. स्थानिक तरुणांसोबत शिक्षण, कौशल्य विकास, करिअर संधी आणि पुढील पिढीकेंद्रित उपक्रमांवर मार्गदर्शक चर्चा झाली. तरुणांचा सहभाग आणि प्रश्न ऐकून पुढील दिशादर्शक योजना मांडण्यात आल्या.
हेही वाचा : ‘भाजपाने आणि काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही’; संजय राऊत

या वेळी बोलताना लहू बालवडकर म्हणाले, प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. हे नाते केवळ राजकीय नाही तर सामाजिक, भावनिक आणि विश्वासाच्या बंधावर उभे आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास माझ्या कार्याचा उत्साह आणि निर्धार अधिक दृढ करतो. लहू बालवडकर यांनी पुढे सांगितले की, हा दौरा अधिक व्यापक प्रमाणात सातत्याने चालू राहील; प्रत्येक प्रश्न ऐकला जाईल, आणि प्रत्येक समस्येला थेट समाधानाची दिशा दिली जाईल.
या दौऱ्यामुळे प्रभागातील सर्व पक्षीय इच्छुक उमेदवार पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे स्थानिकांचे विशेष लक्ष आहे. हा दौरा प्रभागातील प्रत्येक वस्ती, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकांच्या गरजांचे प्रत्यक्ष आकलन करून त्यांच्या प्रश्नांवर थेट उपाययोजना करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे.




