breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘जागतिक हवामान बदलांवर उपाययोजना राबविण्यात भारत अग्रेसर ‘; अमिताभ कांत

पुणे :  तापमानवाढ व हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता भारताने परवडणारी, शाश्वत आणि ऊर्जा सुरक्षा निर्माण करण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला.  याबरोबरच इतर उपाययोजना राबविण्यामध्ये भारत अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जी 20 शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले.

पुण्यातील जे पी श्रॉफ फाउंडेशनच्या ‘स्पीक सस्टेनिबिलिटी’ या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात कांत बोलत होते. अंकिता आणि प्रणती श्रॉफ यांच्या ‘सस्टेन अँड सेव्ह’ उपक्रमाच्या सहकार्याने रॉयल कॅनॉट बोट क्लब या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्योजक संजय किर्लोस्कर, प्रदीप भार्गवा, रवी पंडित, गणेश नटराजन, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह व जे. पी. श्रॉफ आदी उपस्थित होते.

सध्या देशात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सौभाग्य योजने अंतर्गत 3 कोटी घरांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. उज्वला योजनेत 100 दशलक्ष कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले तर उजाला या योजनेच्या माध्यमातून 367 दशलक्ष एलईडी बल्बचे वितरण  करण्यात आले. त्यामुळे आपण तब्बल 47 अब्ज किलो व्हॅट उर्जेची बचत करू शकलो आहोत. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसला देण्यात आलेले प्राधान्य हा या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असून खऱ्या अर्थाने भारत तापमान वाढ आणि हवामान बदल या प्रश्नांवर काम करत आहे, याकडे कांत यांनी लक्ष वेधले.

अमिताभ कांत यांनी आपल्या भाषणात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणे, वायू व सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन आदी भविष्यवेधी संधींची उपलब्धता बघता हरित नोकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, हरित परिसंस्था निर्माण करणे या विषयांचा समावेश होता.2050 पर्यंत भारतातील शेतमालाची मागणी 50 टक्क्यांनी वाढेल असे अनुमान आहे. परंतु त्याच जोडीला हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न हे 30 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाची कास धरत शेतीतील शाश्वत गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यायला हवा, असे कांत यांनी आवर्जून नमूद केले.

‘सस्टेन अँड सेव्ह’ उपक्रमाच्या अंतर्गत यावेळी ‘सस्टेनेबल लाईफस्टाईल टिप्स’ या पुस्तिकेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच कार्यक्रमात ‘अर्थशास्त्र आणि शाश्वतता’ याविषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, किर्लोस्कर ब्रदर्स या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर आणि एमसीसीआयए इलेक्ट्रोनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ गणेश नटराजन यांनी चर्चासत्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. जे पी श्रॉफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अंकिता श्रॉफ सारडा यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button