TOP Newsताज्या घडामोडीपुणे

थंडीच्या कडाक्यात वाढ; हंगामात प्रथमच तापमान १० अंशांखाली

पुणे : उत्तरेकडील राज्यांत तापमानाचा पारा घसरल्याने तेथून येणारे वारे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच रात्रीच्या किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला असून, रविवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे, नाशिक, औरंगाबादचेही किमान तापमान १० अंशांखाली नोंदविले गेले. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातही सरासरीच्या तुलनेत तापमान कमी झाले आहे. पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असून, त्यानंतर तापमानात काही प्रमाणात चढ-उतारांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या आठवडय़ात काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात किंचित वाढ झाली होती. त्यानंतर सर्वत्र निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे किनारपट्टीचा भाग वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या खाली गेले होते. मुंबईसह कोकणाच्या किनारपट्टीच्या भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीजवळ होते. सध्या हिमालयीन विभाग, जम्मू-काश्मीर, लडाख आदी भागांत काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील तापमानाचा पारा घसरला आहे. संबंधित राज्यांत बहुतांश भागांत पारा १० अंशांखाली गेला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही थंडीला पोषक स्थिती निर्माण झाली असून, किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे.

गारवा कायम राहणार
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि जवळच्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागांत सध्या पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातही काही ठिकाणी पुन्हा अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते. त्यातून राज्याच्या तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका कमी होणार असला, तरी उत्तरेकडील तापमानात आणखी घट होणार असल्याने गारवा कायम राहणार आहे.

तापमानात घट कुठे?
रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्यामुळेच थंडीचा कडाका वाढला आहे. नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत पारा ६ अंशांनी घसरला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये तापमानात ३ ते ५ अंशांनी घट झाली आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणीत सरासरीच्या तुलनेत तापमान ४ ते ५ अंशांनी घटले आहे. विदर्भातही तापमानात मोठी घट असून, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आदी भागांत तब्बल ४ ते ६ अंशांनी तापमान घटले आहे. कोकण विभागात १ ते ४ अंशांची घट आहे.

किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे (९.७), जळगाव (८.५), कोल्हापूर (१५.२), महाबळेश्वर (१०.६), नाशिक (९.८), सांगली (१३.३), सातारा (१२.६), सोलापूर (१४.६), मुंबई (२२.२), सांताक्रुझ (१९.८), रत्नागिरी (१९.७), डहाणू (१७.०), औरंगाबाद (९.२), परभणी (११.५), नांदेड (१२.६), अकोला (१२.८), अमरावती (११.७), बुलढाणा (१३.०), ब्रह्मपुरी (१३.१), चंद्रपूर (१३.२), गोंदिया (१०.४), नागपूर (११.४), वाशिम (१३.०),वर्धा (१२.४)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button