breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता सुरक्षेचे ‘कवच’

पुणे : वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने देशातील महत्त्वाच्या व व्यस्त रेल्वे मार्गावर ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टिम) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेत देखील कवच यंत्रणा बसविण्याचा निर्णय नुकताच झाला. मात्र, कोणत्या मार्गावर व कोणत्या रेल्वेत ही यंत्रणा बसवायचे, हे अद्याप ठरलेले नाही.

रेल्वे बोर्डाकडून याबाबत लवकरच स्पष्टता येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन ‘कवच’चा वापर करीत आहे. रूळ व इंजिन असे दोन्हीही ठिकाणी ‘कवच’काम करते. यापूर्वी मध्य रेल्वेत ही यंत्रणा बसविण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता.

मात्र, नुकताच पश्चिम बंगालमध्ये कांचनजुंगा एक्सप्रेसचा अपघात झाला. यात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेत देखील ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेत मुंबई-चेन्नई व मुंबई-हावडा असे दोन अतिमहत्त्वाचे मार्ग आहेत. देशातील व्यस्त रेल्वे मार्गामध्ये या दोन मार्गांचा समावेश होतो.

देशात सध्या दक्षिण-मध्य रेल्वेच्या १२०० रूट किलोमीटरच्या अंतरावर ही यंत्रणा बसविली आहे. यात प्रायोगिक तत्त्वावर बिदर, परळी वैजनाथ, परभणी व मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद, गडवाल, गुंटकल आदी सेक्शनमध्ये ‘कवच’ बसविले आहे. तसेच, या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनमध्ये त्याचे डिव्हाईस बसविले आहे.

हेही वाचा –  लाडकी बहीणसाठी एक खिडकी योजना राबवावी’; निलेश तरस

रेल्वेच्या इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टिम) ही प्रणाली बसविली जाते. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडले गेले असते. यासाठी स्थानकांवर कम्युनिकेशन टॉवर उभारण्यात येतो. यांच्यामार्फत वेगाने धावत असलेल्या गाडीने सिग्नल लाल असताना जर सिग्नल मोडला, तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबेल.

त्यामुळे पुढचा अपघात टळणार आहे. तसेच, हे करत असताना सहायक रेल्वेचालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज नाही. कारण केबिनमध्येच स्क्रीनवर पुढचा सिग्नल कोणता असणार आहे, हे आधीच कळेल. त्यामुळे गाडी थांबवायची की नाही, हे चालकाला आधीच ठरविणे सोपे होणार आहे. यामुळे वेगात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

‘कवच’चा सर्वाधिक फायदा सिंगल लाईन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन रेल्वे समोरासमोर अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो.

यामुळे दोन रेल्वेमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी दोन किलोमीटर आधीच रेल्वे थांबतात आणि अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने रेल्वे धावणे, आदी कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.

या तंत्रामध्ये इंजिन मायक्रोप्रोसेसर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम व स्थानकाशेजारी उभारलेले कंट्रोल कम्युनिकेशन टॉवरचे महत्त्वाचे काम आहे. ते एकमेकांना जोडलेले असतात. एकाच रूळावर दोन रेल्वे समोरासमोर आल्या, तर दोन किलोमीटर आधीच चालकाला आपल्या इंजिनमध्ये समोरून येणाऱ्या रेल्वेची माहिती मिळेल.

त्यावेळी चालकाला जवळच्या सिग्नलवर लाल सिग्नल दिला जाईल. लाल सिग्नल पाहून रेल्वे चालकांनी ब्रेक लावला नाही, तर दोन्ही रेल्वे दोन किलोमीटर आधीच थांबतील. चालकाने ब्रेक लावला नसला, तरीही गाडीतील ब्रेकिंग सिस्टिम आपसूकच काम करेल. परिणामी रेल्वेचा अपघात टळेल. यासाठी ट्रॅकवर ‘आरएफआयडी’ रीडर बसवावे लागणार आहे. एक किलोमीटरच्या अंतरावर ‘कवच’ बसविण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च येतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button