breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

वसंत मोरेंची घरवापसी, हाती बांधले शिवबंधन

पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढलेले वसंत मोरे यांनी आज (मंगळवारी, दि. 9) शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश झाला. वसंत मोरे यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीत शहरात शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद उभी करण्याची ग्वाही मोरे यांनी पक्ष प्रवेशावेळी दिली.

मंगळवारी वसंत मोरे यांनी पुणे ते मुंबई दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन केले. शेकडो गाड्या आणि कार्यकर्त्यांसह ते मातोश्री येथे दाखल झाले. तिथे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी मनसेचे 17 शाखाध्यक्ष, पाच उप विभागाध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या पाच शाखाध्यक्ष यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश केला.

वसंत मोरे सुरुवातीला शिवसेनेत होते. शिवसेनेत असताना त्यांनी शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख म्हणून काम केले. मनसेच्या स्थापनेवेळी ते शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये गेले. दरम्यान ते तीन वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले.

हेही वाचा –  पुणे शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार; काँग्रेसकडून मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

सन 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटाकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा कॉंग्रेसकडे गेली. तिथे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मनसेला मोठा धक्का दिला असून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोरे यांच्यासमवेत ठाकरे गटात प्रवेश केला. आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करून मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

पक्ष प्रवेशावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले, “सन 1990 मध्ये कात्रज मध्ये शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्यावेळी माझे वय 16 वर्ष होते. माझे वय 18 वर्ष नसल्याने मी सुरुवातीला शाखा प्रमुख होऊ शकलो नाही. सन 1992 मध्ये मी बारावी पास झालो आणि पहिल्यांदा शाखाप्रमुख झालो. वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत विभाग प्रमुख म्हणून कॅन्टोनमेंट बोर्ड मतदारसंघात होतो. नंतर मी मनसेमध्ये प्रवेश केला.

आता मी शिवसेनेत प्रवेश केला असे अनेकजण म्हणतात. पण मी प्रवेश केला नसून मी पुन्हा शिवसेनेत आलो असल्याचे सांगत पुणे महापालिकेत ठाकरे गटाचे 25 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील आणि पक्षाची ताकद वाढेल, अशी ग्वाही मोरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button