पुणे-पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी: बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचा उद्या शुभारंभ!
पुणे युनिव्हर्सिटी चौक ते RBI दरम्यान प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुलभ

पुणे | पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा बडी डोकेदुखी ठरलेल्या मार्गांपैकी एक, पुणे युनिव्हर्सिटी चौक ते RBI चौक या अत्यंत व्यस्त मार्गावर बांधण्यात आलेल्या नव्या उड्डाणपुलाचे उद्या, २० ऑगस्ट २०२५ रोजी औपचारिक उद्घाटन होणार आहे.
आज या उड्डाणपुलाची सखोल पाहणी आणि आढावा PMRDA आयुक्त श्री. योगेश म्हसे, पुणे महापालिका (PMC) चे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी तसेच प्रकल्पाचे ठेकेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या पाहणीदरम्यान कामाची गुणवत्ता, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था व नागरिकांच्या सोयी-सुविधांचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
वाहनचालक, नागरिकांना दिलासा…
वाहतूक कोंडीतून मुक्ती: पुणे युनिव्हर्सिटी चौक, सेनापती बापट रोड, खडकी, आणि शिवाजीनगरमार्गे जाणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
वेळेची बचत: या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
प्रदूषणात घट: वाहने सिग्नलवर थांबत नसल्याने कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट अपेक्षित आहे.
आपत्कालीन सेवा सुलभ: रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिस वाहनांसाठीही हा मार्ग आता अधिक सोयीचा ठरेल.
हेही वाचा : आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा संघ जाहीर; सूर्यकुमार यादव कर्णधार
….असा आहे प्रकल्प!
लांबी: सुमारे २.१ किलोमीटर
दुहेरी मार्गिका (Dual carriageway) – दोन्ही दिशांना स्वतंत्र वाहनचळवळीसाठी
स्मार्ट लायटिंग आणि सीसीटीव्ही देखरेखीची सोय
सेंद्रिय जलव्यवस्थापन आणि हरित पट्टा – पर्यावरणपूरक रचना
हा प्रकल्प PMRDA, PMC आणि विविध शासकीय यंत्रणांच्या संयुक्त सहकार्यातून पूर्ण करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अनेक अडचणींवर मात करत तांत्रिक अडथळे दूर करून ही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पुणे शहर झपाट्याने वाढत असताना, अशी स्मार्ट आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून उभारलेली पायाभूत सुविधा भविष्यातील शहर नियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. “नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचवणे, प्रदूषण कमी करणे आणि जीवनमान उंचावणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. पुण्याला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनवण्यासाठी अशा आधुनिक सुविधा ही काळाची गरज आहे.
पुणे युनिव्हर्सिटी चौक ते RBI चौक या महत्त्वाच्या उड्डाणपुलाचे उद्या उद्घाटन होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. या प्रकल्पामुळे हजारो पुणेकरांचे दैनंदिन प्रवासाचे कष्ट कमी होतील. वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. आम्ही आधुनिक, शाश्वत आणि भविष्यातील गरजांसाठी सज्ज असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीस कटिबद्ध आहोत. पुणेकरांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार.






