breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबईत जाऊन माज उतरवू; पुण्यातील शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे-पाटील राजकीय नेत्यांना इशारा

पुणे : ‘मुंबईतल्या अनेकांना माज आला आहे. तो माज उतरविण्याचे औषध मराठ्यांजवळ आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जायचे आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात लई वळू माजलेत, त्यांचा माज नक्की उतरवू,’ असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून दिला.

जरांगे यांची शांतता रॅली आज पुण्यात पोहोचली. कात्रज चौकात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तेथे ‘जेसीबी’च्या साह्याने जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कात्रज ते स्वारगेटपर्यंतचे सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांना चार तासांचा कालावधी लागला. शनिवारवाड्याच्या परिसरात पावणे सातच्या सुमारास ही शांतता रॅली पोहोचली.

जरांगे म्हणाले, ‘एक मुलगा म्हणून लढतोय. आंदोलनामुळे शरीर साथ देत नाही. खूप त्रास होतोय, मी मरणाच्या दारात उभा आहे. खोटं बोलणार नाही, मागे हटणार नाही. आपली लेकरं मोठी करायची आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मोठे करायचे नाहीत.

माझा समाज मोठा झाला पाहिजे, हा माझा अट्टहास आहे. मराठे एक नाहीत म्हणणाऱ्यांना एकी दाखवून दिली. मी बोलतो ते करून दाखविणार. आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही आणि हटायचे नाही. सर्वजण अशीच एकजूट दाखवा.’

हेही वाचा – हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर..’;  देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

तत्पूर्वी, पुण्यात येण्याआधी साताऱ्यात जरांगे यांची पत्रकार परिषद झाली. तीत त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा आग्रहीपणे मांडली.

सातारा जिल्ह्यात सुमारे ८५ हजार व राज्यात लाखो कुणबी नोंदी सापडल्याने आर्थिक निकषावर आरक्षणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहे.

येत्या काळात सगेसोयरे आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचा ‘कार्यक्रम’ करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मराठा समाजाला कायद्यानुसार ओबीसीतून आरक्षण मिळू लागल्याने देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘राज्यातील सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ११ महिने लढा सुरू असूनही सग्यासोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून अद्याप कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. याबाबत निर्णय न झाल्यास मुंबईत जाऊन सरकारला जाब विचारणार आहे, तसेच मराठा समाजाची राज्यात ताकद काय आहे, हे आगामी काळात भाजपला दिसेल.

येत्या २९ ऑगस्टपर्यंत सग्यासोयऱ्यांबाबत निर्णय न झाल्यास मराठा समाज थांबणार नाही. सरकारला ही शेवटची संधी असून, आरक्षण दिल्यास सत्ताधाऱ्यांना मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचायलाही कमी करणार नाही. मात्र, भाजपचे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. आमचा लढा आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसून फडणवीसांनी आमच्या नादाला लागू नये, त्यांना मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ.’

‘देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला येवल्याचा मुकादम छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आमच्या अंगावर टोळी सोडली. त्यानंतर नारायण राणे, आता प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून फोडण्याचे काम सुरू आहे. तरी देखील आमची एकी मजबूत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे,’ असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button